Monday, August 8, 2011

तृप्तीचा कॅमेरा -

नमस्कार मंडळी - !

कसे आहात?!

आज मी मला आलेला अफलातून असा पूर्व जन्मातील देण्या-घेण्याचा एक किस्सा सांगते.

मी अमेरिकत होते व माझ्या मामेभावाने, परागने माझं एका कंपनीच्या ५ रात्री/सहा दिवसांच्या सहलीचं बुकिंग केलं होतं.

मोठ्ठ्या ऐसपैस बसमधून वॉशिंगटन, नायाग्रा, हर्षीज चोकलेटस, कॉर्निंग ग्लास, झालाच तर हारवर्ड, MIT,
बोस्टन, व न्यूयॉर्क मधली मेट्रोपोलिटन म्यूझियम, टाईम्स स्क्वेअर वगैरेही पाहिलं.

यात एक उंच इमारत होती 'Top ऑफ द Rock '.

याच्या ६७व्य मजल्या वरून आम्ही,व इतर अनेकजण चारी बाजूंची मजा बघत होतो.

एव्हाना माझा कॅमेरा पूर्ण भरला होता म्हणून मी परागने दिलेला त्याच्या बायकोचा कॅमेरा वापरायला सुरुवात केली होती.

त्यातून दहा एकच फोटो काढले असतील.

वेळ झाली म्हणून मी खाली बसमध्ये येऊन बसले आणि जाणवलं कि मनगटाला कॅमेरा नाहीये!

माझी अख्खी पर्स उचकटली. दोनदा उचकटली.

अं हं !

तृप्तीचा कॅमेरा गुल!

मी धावत बिल्डींगच्या सेक्युरिटीकडे गेले व त्यांना सांगितलं.

त्यांनी संध्याकाळी ७ ला फोन करायला सांगितलं.

जर कोणी आणून दिला, तर नक्की मिळेल.

मी डोकं फिरवून बसमध्ये बसले.

ती आता चायना टाउनला चालली होती.

छे! जायचाच होता तर माझा का नाही गेला? बिचारया तृप्तीचा का?

मी शांतपणे परत पर्समध्ये बघायला सुरुवात केली.

आणि माझं पाकीट ही नसल्याचं समजलं!

एव्हाना माझ्या मैत्रिणीचा मुलगा मला घ्यायला आला होता आणि आम्ही कारमधून त्याच्या घरी चाललो होतो.

अरेच्चा! हे नक्की काय चाललं होतं ?

गत जन्म, पुनर्जन्म, देणी-घेणी, - हा तर माझा अभ्यासाचा विषय!

मी रोहीतला म्हंटल मी तुझ्या black berry वरून पुण्याला एक फोन करू का?!

तो म्हणाला हो,करा की,आणि त्याने लावूनही दिला.

मी माझ्या मामीशी बोलून तिला रात्री स्काइपवर यायला सांगितलं.

रोहितने मला त्याच्या laptop वर स्काइप सुरु करून दिलं.

मी तिथूनच म्हणजे अमेरिकेतून तिला 'रिग्रेस ' केलं आणि तृप्तीच्या कॅमेऱ्याच काय झालं ते बघायला सांगितलं.

ती म्हणाली की मला फक्त एक उत्तर येतंय की 'देणं आहे - का देणं होतं,असं काहीतरी'.

मी म्हंटल की मी तिला एक कॅमेरा घेउन दिलं तर माझं देणं फिटेल का?

तर उत्तर आलं की 'हे तिचं देणं होतं!'

आता आली पंचाइत!

हे सांगणार कसं?

पराग आणि तृप्ती दोघेही परत त्यांच्याकडे गेल्यावर मला कॅमेऱ्याच विसरायला सांगत होते.

आणखी २-३ होते हा गेला तर गेला!

माझ्या 'पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी'बद्दल त्यांना थोडी माहिती होती.

गप्पा मारताना जास्ती कळल्यावर दोघांनाही सेशन हवं होतं.

तृप्तीने कुतूहल म्हणून काही पूर्वजन्म बघितले.

त्यानंतर गुहेत अध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन झाल्यावर मी तिला म्हंटलं की मी एक प्रश्न विचारू का?

ती म्हणाली हो.

मी विचारलं की तू कोणाचं काही देणं लागतेस का?

मागचे जन्म स्कॅन करून बघ.

ती दोन मिनिटांनी म्हणाली, 'नाही, मी कोणाचं काही देणं लागत नाही'.

मी म्हंटलं,'तुझा कॅमेरा कुठे आहे ते बघ'.

ती एक-दोन मिनिटं घेउन म्हणाली, ' एक उंच, चांगल्या, कपड्यातला चांगला दिसणारा माणूस आहे. कृष्णवर्णीय आहे.त्याच्या हातात आहे आणि तो त्यातले सगळे फोटो बघतोय. आपले ' लूरे केव्हरन्स ' आणि ' चेरी - पिकिंग'चें बघून हसतोय.तो चोर नाहीये'.

मी म्हंटलं, 'माझ्याकडून कॅमेरा कसा हरवला?'.

तिने परत स्कॅन केलं.

म्हणाली, 'तुम्ही एका उंच बिल्डींगवर आहात. फोटो काढत आहात. क्षणभरासाठी कॅमेरा ठेवलात आणि विसरून दुसरीकडे गेलात. हा माणूस लगेचच तिथे आला आणि त्याने तो बघितला. इकडे-तिकडे पाहिलं पण कुणीच तो घ्यायला आलं नाही म्हणून त्याने ठेउन घेतला.'

मी म्हंटलं, ' या माणसाच्या बरोबरच्या एखाद्या पूर्वजन्मात जा'.

ती क्षणभराने म्हणाली, ' तो एक माकड आहे. फांदीवर बसलाय आणि काहीतरी खातोय'.

'तू कुठे आहेस?'

'मी दुसर्या, वरच्या फांदीवर आहे आणि मी उडी मारून त्याच्याकडे जाउन ती वस्तू हिसकावून खाल्ली'.

'त्या जन्मानंतर तू आणि तो दुसर्या कुठल्या जन्मात एकत्र होता का?'

'नाही.'

तुझा कॅमेरा त्याच्याकडेच कसा गेला?'

'मी त्याचं देणं होते.'

'यात मी कशी मध्ये आले?'

'इतक्या जन्मात तो आणि मी कधीच एकत्र नव्हतो आणि माझं हे देणं चालूच राहिलं होतं. आत्ताही तुम्ही हे संपवायचा एकुलता दुवा होता'.

तर अशी ही तृप्तीच्या कॅमेरयाची खरी-खुरी गोष्ट!

माझ्या इंग्लिश ब्लॉगमध्ये हे लिहिल्यावर एक-दोघे आपापल्या चोरीला गेलेल्या कॅमेरा आणि मोटार-सायकलची काही पूर्वजन्मीची भानगड आहे का हे बघायला आले!

मागील जन्मात एकीने देणं ठेवलं होतं तर दुसर्याने चोरी केली होती!

यातून आपण काय बोध घ्यायचा?

चोरी, वस्तू हरवणे या मागे काही कारण असू शकतं.

आपण आपल्या वस्तूंची सर्वतोपरे काळजी घ्यावी, तरीही गेली, तर मनातून काढून टाकावी.

आपण कुठल्याही प्रकारची चोरी करू नये.

यात भ्रष्टाचार आला.

आज एवढी गोष्ट पुरे!

मज्जा करा!








Sunday, July 17, 2011

सिनेमा रसग्रहण

नमस्कार, मंडळी!

मी १५ जून म्हंटलं होतं पण माझी भिंगरी चालूच होती!

आधी त्या एक महिन्याच्या कोर्स बद्दल सांगते!

पुण्याच्या Film Institute व Film Archives या दोन संस्था मिळून दर वर्षी एक महिन्याचा 'सिनेमा रसग्रहण' नावाचा कोर्स चालवतात.

सरकारी काम असल्यामुळे म्हणा, याची फारशी वाच्यता होत नाही, तरी ६० सीटस साठी ११०० फॉर्म्स आले होते!

देशाच्या कुठल्या-कुठल्या कोपारयातून लोक आले होते!

शिवाय बांगलादेशातून एक व श्रीलंकेतून ३ होते!
सर्व-साधारणपणे आपण सिनेमा बघतो म्हणजे नट-नट्या कोण आहेत, गाणी कुठली आहेत आणि कुठे शूटिंग झालाय एवढा विचार करतो आणि नंतर 'बरं होतं' किंवा 'काय वाट्टेल ते दाखवतात' असं म्हणतो.

पण एखाद्या दिग्दर्शकाला काय दाखवायचं होतं, ते तो १००% दाखवू शकलाय का, त्यासाठी त्याने कुठली तंत्र वापरली, एखाद्या सीनमध्ये काय काय होतं, पिक्चर केव्हा व का 'कंटाळवाणा' होतो हे सगळं या कोर्समुळे समजायला लागतं!

तुम्हाला माहित आहे आपला सिनेमा कसा सुरु झाला?

त्याची खरी सुरुवात आदि मानवाने शेकडो वर्षांपूर्वी गुहेचा भिंतींवर आपल्या आयुष्यातल्या घडामोडींची रेखाचित्र काढून केली!

काही शतकांनंतर रंग गवसले आणि कापड, कागद, कॅन्वस, भिंती, छत, दिसेल त्यावर निसर्गातल्या व मनातल्याही घडामोडी रंगू लागल्या.

गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून शास्त्रात वेगाने प्रगती होत चालली होती.

रसायन शास्त्रात जशा नव्या गोष्टी आल्या, त्यांचा वापर वेग-वेगळ्या पद्धतीने केला जाऊ लागला.

आधी साधा कॅमेरा आला.
काळी-पांढरी चित्रं आली.

मग गती बंदिस्त करण्याची कला आली.

त्या कॅमेर्याचं महत्व पहिल्या महायुद्द्धात जर्मनीने जाणलं व आपली मतं व विचार यांचा सतत मारा करून लोकांचं मन आपल्याला हवं तसं घडवायला फोटो व सिनेमाचा अत्यंत खुबीने वापर केला.

दुसर्या महायुद्धाच्या वेळेपर्यंत अमेरिका, इंग्लंड व फ्रांस हे देशही हे तंत्रज्ञान वापरू लागले होते.

युद्ध संपल्यावर सिनेमातले विषय जरा आपापल्या देशातल्या परिस्थितिंकडे वळले.

शंभर वर्षापूर्वीही अमेरिका हे सगळ्या प्रकारच्या संशोधनांसाठी, पेटंट घेण्यासाठी व ते घेतल्यावर लगेच जगभर त्या गोष्टीची विक्री करून परत संशोधनात पैसे ओतण्यासाठी प्रसिद्ध होतं!

हॉलीवूडने जोम धरला होता,
अनेक उत्तम सिनेमे बाहेर येत होते.

कॅमेरे, चित्रीकरण,ध्वनी, दिग्दर्शन, विषय - सगळं खूप खूप उत्साहित करणारं होतं.

त्या काळात अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड, पोलंड, फ्रांस, जर्मनी, आणि जपान या देशात जे सिनेमे झाले, ते आजही अचंबित करायला लावतात!

त्यांचे विषय, हाताळण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती ज्या त्या-त्या देशाच्या अनुभवातून आल्या होत्या, मन गुंगवून टाकतात!

कोर्स मध्ये आम्हाला दुपारी ४ पर्यंत लेक्चर्स असायची.त्यात ही क्लिप्स दाखवायचे.

४.४५ ला एक सिनेमा असायचा. त्यातील महत्वाच्या गोष्टी आधी सांगायचे.

७.३० ला दुसरा सिनेमा. त्यावरची चर्चा दुसर्या दिवशी सकाळी व्हायची.

असे आम्ही जगातील अनेक 'क्लासिक' असे सिनेमे बघितले!


मी काही नावं देते, tv वर, नेटवर पहा किंवा एखादा फिल्म-क्लब बनवा आणि बघा!

१. मेट्रोपोलीस - जर्मनी - १२७ मिनिटं - Lang .

२.Battleship Potemkin - रशिया -७२ मिनिटं - आय्झेन्स्तीन

३.सिटीझन केन - यू.एस -११९ मिनिटं -ओर्सन वेल्स.

४.सनराइज - १९२७ - यू.एस. - मुरनाव

५.रोम ओपन सिटी - १९४५ -इटली - १०१ मिनिटं - रीझेलिनी.

६.A Man Escaped - १९५६ - फ्रांस - जर्मनी - ९० मिनिटं - ब्रेसोन

७. दोदेस्का डेन - जपान - कुरोसावा

८. Man विथ अ मूवी कॅमेरा - १९२९ - रशिया - ६० मिनिटं - वर्तोव

आपल्याकडचेही काही सिनेमे दाखवले, जसे 'कुम्माती', 'साहिब, बीबी और गुलाम', 'चारुलता', 'पाथेर पांचाली', 'सुबर्ण रेखा', 'संत तुकाराम', 'मी सिंधुताई सपकाळ', 'कनसेंब कुदुरेयमेले' वगैरे.

या शिवाय आपले सिनेमे/documentary घेउन काहीजण आले होते व त्यांनी नंतर आमच्या प्रश्नांना उत्तरंही दिली.
सिनेमात 'short फिल्म' हा एक खिळवून टाकणारा प्रकार असतो हे नवीन कळलं!

यात '१० मिनिट्स ओल्डर' सारख्या जागतिक फेस्टिवल मधले काही दाखवले.

जे हवं ते सांगा, पण १० च मिनिटात !

लोक काय अफलातून विषय घेतात आणि काय त्या मांडण्याच्या क्लुप्त्या!

एकूण काय, सिनेमा ही जेव्हढी 'एन्जॉय' करायची गोष्ट आहे तेवढीच गांभीर्याने घ्यायचीही आहे हे कळलं!

प्रत्येक लहान-मोठ्या शहरात फिल्म-क्लब असावे असं या संस्थांना मनापासून वाटतं व त्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला ते तयार आहेत.

तर आता तुम्ही ही मनावर घ्या व मी दिलेल्या यादीतले तर सगळे बघाच!

बाकी एन्जॉय!

Thursday, May 12, 2011

वरील चार चक्रं

नमस्कार, मंडळी!

आपण कसे आहात?


माझ्या पायाची भिंगरी परत फिरू लागली आहे!

मी उद्यापासून ९ ते रात्री ९ अशी एक कार्यशाळा करतेय.

एक महिन्यासाठी!

त्यामुळे यापुढची पोस्ट १५ जूनला असेल.

कार्यशाळेत काय शिकले, काय मजा केली तेही त्यात सांगेन!

मागच्या पोस्टमध्ये आपण मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची थोडीशी माहिती घेतली व आशा आहे की २ - २ मिनिटं का होईना, त्यांच्यावर ध्यानाला सुरुवात केली!


आता आपण चौथ्या चक्राबद्दल जाणून घेऊ.

याचं नाव 'अनाहत' व स्थान हृदयात आहे.

याचं तत्त्व आहे हवा.

या चौथ्या चक्रापासून पंचमहाभूतांतील तत्त्व
जणू अदृश्य होतात!

मागील तीन होती पृथ्वी, जल आणि अग्नि, ज्यांचा सगळ्या इंद्रियांमधून अनुभव घेता येतो.

आता मात्र जाणण्यावर भर येतो,अनुभूतीचं महत्व वाढतं.


अनाहत चक्राचा रंग हिरवा आहे व याला बारा पाकळ्या आहेत.

हे नीट कार्यरत असलं की आपल्यात इतरांबद्दल प्रेमाचे भाव असतात ज्यामुळे मन:शांती मिळते.

या चक्रापासून, या चक्रातून,आपण जसे बाहेरच्या जगाकडे बघायला लागतो.

आपल्यात अनुकंपा व प्रेमभावना असेल तर खालील तीन चक्रांमध्ये जो भयगंड,वासना व भावनांचा कल्लोळ असतो,तो संतुलित होऊ लागतो.

आता शांतपणे बसा व हृदयावर लक्ष केंद्रित करा.

श्वासात बदल करू नका. काही मिनिटं मन तिथे केंद्रित करा.


आणखी काही माहिती!

पहिल्या, मूलाधार चक्राचा मार्ग हठयोगाचा आहे.

दुसरया, स्वाधिष्ठान चक्राचा मार्ग तंत्राचा आहे.

तिसरया मणिपूर चक्राचा कर्ममार्ग आहे.

चौथ्या अनाहत चक्राचा भक्तीचा आहे.


आता पाचवं 'विशुद्ध' चक्र बघू.

हे आपल्या गळ्यात असतं.

याचा रंग तेजस्वी निळा असतो आणि याचं तत्त्व असतं ध्वनी.

संपर्काबरोबरच हे निर्मिती किंवा सृजनाचही स्थान आहे.

याला सोळा पाकळ्या आहेत व याचा मार्ग आहे मंत्राचा.

मागीलप्रमाणेच या विशुद्ध चक्राच्या जागेवर मन केंद्रित करून थोडा वेळ स्वस्थ बसा.


आपलं सहावं चक्र आहे 'आज्ञा' जे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे.

याचा रंग नीळ आहे व तत्त्व
आहे प्रकाश.

हे आपल्या अंतर्ज्ञानाच व कल्पनेचं स्थान आहे.

याला दोनच पाकळ्या असतात व याचा मार्ग आहे यंत्राचा.

अनेकांना या जागी ध्यान लावायची सवय असते व कधीकधी काही 'अनुभव' - म्हणजे ज्योत, प्रकाश वगैरेही दिसतं म्हणतात.

एकाच लक्षात ठेवायचं!

ही जणू शिडीची सहावी पायरी आहे.

एकदम इथूनच सुरुवात केली किंवा खालाच्यानकडे दुर्लक्ष झालं तर कोसळायला वेळ लागत नाही.

आपल्या ऐकिवात / माहितीत असे अनेकजण असतील जे अध्यात्मिक मार्गावर दोन पावलं गेलं की अफाट भक्तगण गोळा करतात, पैसा जमवतात, यातलं काही कमी होऊ नये, कुणाला आतल्या गोष्टी कळू नये म्हणून सुरक्षेची मोठ्ठी यंत्रणा जोपासतात.

मग त्यांचे पैशाचे गैर व्यवहार, वासनाकांड, खून, बळी सारखे गुन्हे उघडकीस येतात.

खालच्या तीन चक्रांवर नियंत्रण असणं म्हणून महत्त्वाचं आहे.


सातव्या चक्राला 'सहस्रार' म्हणतात व ते टाळूवर असतं.

याचा रंग गडद जांभळा किंवा पांढरा शुभ्र असतो.

याचं तत्त्व आहे जाणीव.

याचं काम आहे समजणे, उमजणे, ज्यामुळे परमानंदाची अनुभूती होते.

याचा मार्ग ज्ञानाचा आहे.

सातही चक्रांवर आपण रोज २-३ मिनिटं शांतपणे ध्यान केलत की चक्रांची जाणीव होऊ लागेल.

ही १२ - १५ मिनिटं स्वत:ला द्याच.

ही जशी संतुलित होऊ लागतील, तसं आयुष्यातही संतुलन येईल.

चक्रांवर इंग्रजीत खूप खोलात जाऊन, संशोधन करून अनुभव घेऊन मग लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत.

अतिशय गंभीरपणे यावर संशोधन झालं आहे व चालू आहे.

त्याच बरोबर रस असणाऱ्या प्रत्येकाला याचा पुरेपूर लाभ घेता येईल अशा कार्यशाळा घेतल्या जातात.

मी काही पुस्तकांची नावं देते. मोठ्या दुकानात मिळायला हरकत नसावी.

Chakras Wheels of Life - Anodea Judith Ph.D

Eastern Body Western Mind : Psychology and the Chakra System as a Path to the Self - Anodea Judith Ph.D

Anatomy of the Spirit : The Seven Stages of Power and Healing - Dr Caroline Myss

आता अभ्यासाला लागा!

एक महिन्याने भेटू.

बाय!

Sunday, April 17, 2011

पहिल्या ३ चक्रांच ध्यान

नमस्कार!

परत बर्याच दिवसांनी भेटतोय!

सांगितलं ना, माझ्या पायाला भिंगरी आहे!

खूप भटकून आले!

पाचगणीला जाउन para - gliding केलं!

४००० फुटावरून खालची जमीन किती सुंदर दिसते!

दर्या, खोरी, शेतं, माणसं अगदी मस्त दिसतं.


आपल्याबरोबर एक प्रशिक्षकही असतो, त्यामुळे घाबरायचं कारण नसतं.

सगळ्यांनी एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे!


मागच्या पोस्टमध्ये कुंडलिनीच्या ७ चक्रांवरच्या ध्यानाबद्दल बोलणार होतो.

आता सुरु करूया!

खूप इन्टरेस्टिंग असा विषय आहे!

आपल्या भारतीय संस्कृतीत, औषध-उपचारात चक्रांच्या संबंधी भरपूर माहिती असली तरी सामान्य माणूस अजूनही काही सत्यं मान्य करायला कचरतो.

पाश्चात्य विज्ञान अजून डोळ्यांना जे दिसतं, कानांना ऐकू येतं,स्पर्श करता येतो वगैरे ५ इंद्रियांच्या मितीतच बंदिस्त आहे.

पण त्यांनी भरपूर संशोधन केलं आहे व जे उपयोगी सिद्ध होतंय,ते तेवढ्याच वेगात सामान्य लोकांपर्यंत पोचवलंही जात आहे.

यू-ट्यूबवर 'चक्र-मेडीटेशन' वर असंख्य video आहेत!


आज आपण सर्व साधारणपणे डोळ्यांना न दिसणाऱ्या या चक्रांवर कसं ध्यान करायचं ते पाहू.

आधी साती चक्र कुठे आहेत त्या जागा समजून घेऊ.

आपलं सर्वात खालून पहिलं चक्र आहे 'मूलाधार',जे आपलं गुदद्वार आणि आपलं बाह्य जननेन्द्रिय यांच्या
मध्ये असतं.

नावाप्रमाणे ते जणू मुळाला आधार देतं.

पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे या चक्राचं तत्व आहे.

याचा रंग लाल आहे.

हे चक्र नीट कार्यरत असणं अत्यंत आवश्यक आहे कारण हेच आपल्याला भक्कमपणे उभं ठेवतं.

याचमुळे आपण पृथ्वीशी जोडलेलो असतो.

आपल्या सर्व प्रकारच्या भीतीचं मूळ या चक्रात असतं.

आपण जर सगळ्या भयगंडान्वर मात केली, तर हे चक्र व्यवस्थित काम करतंय असं समजायला हरकत नाही.

किंवा, दुसरीकडून पाहिल्यास, हे चक्र जेव्हा नीट काम करतं, तेव्हा आपण आपल्या भीतीवर विजय मिळवलेला असतो.

पहिल्या चक्राचं ध्यान कसं करायचं?


एका जागी बसा.

खाली मांडी घालून किंवा खुर्चीवर, फक्त दोन्हीत पाठ ताठ हवी.

खुर्चीवर बसला असाल तर पाय जमिनीला टेकवा.

श्वास शांत होऊ दे.

मग पाठीच्या मणक्याच्या शेवटचं टोक जिथे आहे ती जागा, या चक्राची जागा
मनात आणा.

त्यावर ध्यान लावा.

तिथे एक चक्र आहे त्याचा रंग लाल आहे, त्याला ४ पाकळ्या आहेत
आणि आता ते जसं फिरायला पाहिजे, तसं व्यवस्थित फिरतंय असा मनात विचार करा.

साधारण २ -३ मिनिटं लक्ष केंद्रित असू द्या.


मग पुढील चक्राकडे या.

दुसरं आहे स्वाधिष्ठान.

हे नाभीच्या खाली २ (आडवी!) बोटं असतं.

याचं तत्व आहे जल.

आपलं पैसे व लैंगिकता यासंबंधात जे नातं असतं,
त्याचं मूळ या चक्राच्या नीट फिरण्यावर अवलंबून असतं.

याचा रंग केशरी आहे व याला ६ पाकळ्या आहेत.

मागच्या सारखाच या जागेवर लक्ष केंद्रित करा व २-३ मिनिटं तिथे रहा.



आता येऊ तिसरया चक्राकडे.

हे आहे 'मणिपूर' जे आपल्या नाभीच्या जागी असतं.

याचं तत्व आहे अग्नी.

या चक्राचा संबंध आपल्या भावना व आत्मबळाशी असतो.

हे पिवळ्या रंगाचं आहे आणि याला दहा पाकळ्या आहेत.

मागीलप्रमाणे आता आपल्या नाभिकेंद्रावर ध्यान लावून शांतपणे बसा.


ही तीन चक्र आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत.

आध्यात्मिक प्रगतीचा वेध प्रत्येक मनुष्याला असतो.

त्याने जर आधी ही तीन चक्र व त्यांचे विषय मोकळे केले तर त्याची भक्कम पायाभरणी होऊन प्रगती होईल.

रोज ५ मिनिटं हे ३ चक्रांवरचं ध्यान मनाला मोठ्या प्रमाणात संतुलित करण्यास मदत करेल.

आपण सुरु करा!

पुढील 'पोस्ट'मध्ये पुढची ४ बघू.

Wednesday, March 9, 2011

७ पातळ्या

रामराम!

कसे आहात?!
बर्याच दिवसांनी लिहितेय!

माझ्या पायाला न, भिंगरी आहे!
आणि डोक्यात अनेक मस्त विचार!

मागच्या महिनात, १ ते २८ फेब्रुवारी, मी 'योग प्रशिक्षक' चा कोर्स केला!
आता मी खरच कुणाला शिकवणार आहे का?!
नाही! पण मला स्वत:साठी जी शिस्त हवी होती, एक आठवडा, १० दिवस नाही, जास्त काळासाठी, ती महिनाभर मिळाली।



तुम्हीही S VYASA हे गुगल करा आणि सगळी माहिती नीट वाचून बघा.
स्वामी विवेकानंदानच्या नावाने काढलेलं, बेंगलोर च्या बाहेर ३२ कि मी वर असलेलं हे एक योग अनुसंधान संस्थान आहे.
सुरुवातीला तिथे वाटलं की ब्लॉगवर जाउन अपडेट करता येईल, पण अगदी मस्त गुंतवून ठेवलं होतं!
पहाटे ४ ला उठायचो, रात्री ९.३० नंतरच पाठ टेकायची!
तसा मध्ये विश्रांतीला वेळ असायचा, पण पोस्ट लिहिण्याइतका सलग नाही।


आपण 'प्रस्थान' या पोस्टमध्ये आपल्या या जन्मांची सुरुवात कशी झाली ते जाणून घेतलं.
आपण एकटे येतो, १५० ते २०० च्या कबिल्यात किंवा आणखी मोठ्या, लाखो - कोट्यवधींच्या आकड्यात.

आता पुढची पायरी बघू.
आपण सुरुवातीला धरती, पर्वत, नद्या असे 'minerals ' या क्षेत्रात मोडतील असे जन्म घेतो.
मग वृक्ष, झाडं, फुलं - पानं वगैरे.
त्यानंतर प्राणी - पक्ष्यांचे जन्म येतात व शेवटी मनुष्याचे.

आपली एक घट्ट अशी आणि अफाट सोयीस्कर अशी खात्री आहे की हा माणसाचा जन्म संपला की स्वर्ग!
आपण कसेही वागलो तरी आपल्याला मोक्षच मिळणार, नाहीतर कमीतकमी स्वर्ग, कारण मनुष्याचा जन्म हेच आपलं ध्येय होतं.
भारताची लोकसंख्या वाढतच राहायला हे एक कारण असू शकेल!
'मी कड्यावरून उडी मारली तरी खाली पडणार नाही', 'मी विष प्यालो तरी जगेन कारण माझा माझ्या गुरूंवर पूर्ण विश्वास आहे', 'माझी साधना इतकी खडतर आहे की हा माझं शेवटचाच जन्म आहे' असं आपण अनेक वेळा ऐकतो.
शेकडो भ्रष्टाचार्यांना याचं खात्रीत मस्तीत जगताना बघतो.
आपण इथे गल्लीचे दादा असू किंवा भाई, निसर्गाचे नियम कोणासाठीही बदलत नाहीत.

मनुष्याच्या उत्क्रांतीत त्याचे पहिले काही शेकडा जन्म भयभीत अवस्थेतले असतात.
'मी त्यांना मारलं नाही तर ते मला मारणार' अशी त्यांची पक्की खात्री असते, म्हणून ते चटकन खून, मारहाण करू शकतात.
या पातळीवर अनेक जन्म घेतल्यावर ते जरा योजनाबद्ध आयुष्य शोधतात.

ही दुसरी पातळी. यांना 'आपले लोक' जवळ असले कीच सुरक्षित वाटतं म्हणून हे क्लब, संघ, संघटना, ग्रूप वगैरे बनवून अनेकांचा आधार स्वत:मागे बघतात.
जगातल्या सगळ्या प्रकारचे कामगार, सैनिक, कम्युनिस्ट ते कॅपिटालिस्ट सगळ्या राजकीय पक्षातील तळागाळातले कार्यकर्ते, प्रत्येक धर्माचे अनुयायी हे यात मोडतात.
भीती कमी झाली, योजनाबद्ध आयुष्याची सवय होऊन कंटाळा आला की आता यांना सत्ता हवी असते.
हे मग भाई, दादा, बॉस, साहेब, मालक, सरकार वगैरे बनतात.


या तीन पातळ्या मनुष्याच्या उत्क्रांतीत खूप, खूप महत्वाच्या आहेत.
आपण सर्वजण यातून गेलो आहोत आणि स्वत:ला कितीही अध्यात्मिक म्हणवून घेतलं, तरीही बहुतेक जण यातच अडकलेलो आहोत.


या तीन पातळ्या आपली 'animal instincts' आहेत.
ही आपल्यावर अनेक प्रकारच्या नकारात्मक भावनांमधून अंकुश ठेउन नाचवतात.
प्रत्येक पातळीवर आपल्याला मनाच्या सुप्त खोलात का असेना, 'वर' जायचा ध्यास असतोच, पण या तिनात असताना आपल्याला आयुष्य हे खूप कठीण, निरर्थक वाटतं. कुठेही समाधान मिळत नाही आणि नक्की काय कमी आहे हे ही कळत नाही.

या तिनांचा विळखा सैल झाला की आपण सतत बाहेर बोट दाखवायचं कमी करून पहिल्यांदा हा प्रश्न स्वत:लाच विचारतो की -
'मी कोण आहे?'
या चौथ्या पातळीपासून आपला आध्यात्मिक प्रवास सुरु होतो.


सर्वसाधारणपणे कुणालाही न दुखावणारे (शाब्दिक हिंसाही वर्ज्य आहे बरं का!), स्वत:च्या शोधाची जाणीव झालेले असे हे लोक आता हे ही जाणतात की मेल्यावर 'त्या तिथे पलीकडे तिकडे' ही एक भव्य असं विश्व आहे जे आपलं खरं घर असेल असं त्यांना वाटतं.
यांना मरायची घाई नसते. अजून भावनांचा उद्रेक होतो, पण ते काबू राखावा या जाणिवेपर्यंत पोचलेले असतात.

पाचव्या पातळीचे लोक बर्याच अंशी निर्लिप्त राहू शकतात.
त्यांच्यावरही संकटं येतात, पण ते दुसर्याला न दुखावता शांत राहू शकतात.
या शांतपणामागे 'मरा तुम्ही, काही सांगून उपयोग नाही' हे भाव नसतात!
ते दुसर्यांच्यात नाक खुपसत नाहीत आणि स्वत:च्या मार्गावरून विचलित होत नाहीत.

सहाव्या पातळीवर पोचेपर्यंत पुनर्जन्मांची आवश्यकता संपलेली असते.
या व्यक्ती पृथ्वीवर येतात ते लोकहितासाठी.
जगातले सगळे साधू -संत, अध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं ज्यांच्यामुळे मोठ्या जनसमुदायाला लाभ झाला आहे असे यात येतात.
हे उद्योगपती, कार्यकर्ते असू शकतात. गांधी, मंडेला, मदर तेरेसा, विवेकानंद, अनेक क्षेत्रातील मोजक्या व्यक्ती यात येतील.

सातव्या पातळीवर अशी चैतन्य आहेत जी जेव्हा पृथ्वीवर येतात, तेव्हा अक्ख्या पृथ्वीचे तरंग बदलून अधिक शक्तिशाली, अधिक शांत, सकारात्मक बनवतात.
यात बुद्ध, कृष्ण, येशू, पैगंबर या सारखे युग पुरुष येतात.

आता आपल्याला हे पक्कं जाणून घ्यायचंय.
आपल्याला पाचव्या पातळीपर्यंत जायचंच आहे आणि ते ही स्वबळावर.


पहिल्या तीन पातळ्यांचे गुण आहेत भीती, वासना आणि भावना.
अनेकांच्या मनात सतत काही न काही धास्ती असते. ती काढायचा ते प्रयत्नही करत नाहीत. त्यांच्या जवळचे ही 'तो/ती/ते/त्या आहेतच तशा' म्हणून लक्ष देत नाहीत.
कुठल्याही देवाची, स्वामींची नुसती उपासना करून काहीच फायदा होत नाही.
'नशिबात आहे म्हणून भोगायलाच पाहिजे' ही केवळ आळशीपणाला प्रचंड उत्तेजन देणारी वृत्ती फक्त आपल्यातच आहे.
भूक लागली की आपण 'असेल नशिबात तर पडेल माझ्या तोंडात' म्हणत नाही.
हरीवर कितीही भक्ती असली तरी खाटल्यावर बसून राहत नाही.
नोकरी, चोरी - काही न काही करतोच! अगदी काम ही!

माझ्या पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशन मधून एक गोष्ट सतत पुढे येते.
आपल्या भीती, वासना व भावनांकडे दुर्लक्ष करून पुष्कळांना अध्यात्मिक प्रगतीची घाई झालेली असते.
'अध्यात्मिक प्रगतीसाठी मी काय करू?' हा प्रश्न खराच मनापासून विचारलेला असतो.

त्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नही चालू असतात पण दुसरीकडे कुणावर प्रचंड राग असतो.

नाती बिघडलेली असतात आणि त्यांचा विचारच करायचा नसतो.
या गोष्टी मागे ढकलून तुम्ही प्रगती करू शकत नाही हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा.
हे गुंते न सोडवल्यामुळे परत - परत त्याच व्यक्तीनबरोबर जन्म घ्यावे लागणार आहेत हे ध्यानी असू देत!
त्या पेक्षा आपल्या खालच्या तीन पातळ्यांचा शांत चित्ताने विचार करा.
स्वत:शी इमानदारीने कुठे चुकत आहात ते मान्य करा, हो'पोनोपोनो करा, विपश्यनेला जा.

पोटातलं कडू गाठोडं कमी होत विरघळून गेल्याच तुम्हालाच आतून कळेल.
तीच तुमच्या अध्यात्मिक प्रगतीची सुरुवात आहे.

पुढच्या पोस्टमध्ये या साती पातळ्यांवर ध्यान कसं करायचं ते सांगेन.

आपण सगळे न, एक ' work in progress ' आहोत! याचा पुरावा हाच की आपण पृथ्वीवर आहोत!
म्हणून सेशन ला आलात तर मोकळेपणाने मागील जन्म बघा। तुम्ही मागील जन्मापासून आजपर्यंत किती प्रगती केली आहे हे अनुभवाल, आजच्या प्रश्नांचं भय वाटणार नाही आणि नाती, भावना व वासना या गोष्टी भेडसावणार नाहीत.


बाकी ठीक!
मजेत रहा!

Saturday, January 29, 2011

हो'पोनोपोनो

नमस्कार!

आज आपण एका अतिशय सुंदर ध्यान-साधने संबंधी जाणून घेऊ या।
याची माहिती मागच्या वर्षी एका अंकात आलेली आहे पण अंक कायम रहात नाहीत, ब्लॉगवर ही कोणीही केव्हाही वाचू शकेल।

तर काय झालं, काही वर्षांपूर्वी हवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं जे केवळ खुनशी वेड्यांसाठी होतं। ज्यांना समाजाने 'क्रिमिनली इनसेन' ठरवून हाता - पायात साखळदंड बांधून डांबून टाकलं होतं.

त्यांना भेटायला फारसं कुणी येत नसे। ती इतकी भीषण जागा होती की नर्सिंग स्टाफ, सैपाकी व डॉक्टर ही काहे आठवडे, एखाद - दोन महिन्यांवर तिथे टिकू शकत नसत.
अनेक रिसर्च सेन्टर्स, हॉस्पिटल, मनोवैद्न्यानिक लोक मात्र येउन येउन वेगवेगळी संशोधनं करत।
रुग्णांवर त्याचा काही ही परिणाम होत नसे।
ही थोर माणसं येउन निष्कर्ष करून डिग्र्या घेत, ते आपल्या काळ्या विश्वात तळमळत, संतापत असत।

मग एक नवा माणूस आला. 'मी एक काही प्रयोग करू का?' म्हणाला.
तिथले मोठे डॉक्टर्स म्हणाले, 'कर बाबा, तू ही 'कर।

त्याने सगळ्या रुग्णांच्या फाईल्स मागवल्या. एक छोटी खोली पुरेल म्हणाला.
तो रोज सकाळी ९ला यायचा। खोलीचं दार बंद करून आतच असायचा.
संध्याकाळी ५ वाजता निघून जायचा। परत दुसर्या दिवशी ९ला हजर.

तिथल्या लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही.
मग काही आठवड्यात फरक जाणवू लागला।

अरेच्चा! हे खुनशी लोक जरा बरं वागतायत की.
हळू - हळू त्यांचात सुधारणा होउ लागली.
संताप, उद्विग्नता, क्रौर्य कमी दिसू लागलं.

ती परोलवर जाण्या योग्य झाली.
बाहेरच्या कसलाही कंट्रोल नसलेल्या जगात, त्यांच्या राग - संतापाच्या नात्यात जाउनही ते मुदत संपल्यावर नीट परत येउ लागले।

नर्सिंग स्टाफ, सैपाकी, माळी, सुरक्षा कर्मचारी, सगळेच टिकू लागले.
बदल होत होत ते रुग्ण बरेही होऊन बाहेर जाउ लागले।

आणि चारच वर्षांनंतर एक दिवस असा उजाडला , की आता रुग्णच नाहीत म्हणून ते हॉस्पिटल चक्क बंद करावं लागलं!
असे दोनच राहिले होते ज्याना सरकारने अमेरिकेतल्या हॉस्पिटलात हलवलं आणी ते खुनशी वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं!

सर्वच मानसतद्न्य, संशोधक, प्रसार माध्यमांना चक्रावून टाकणारी गोष्ट होती ही.
त्यांनी विचारलं, की हा चमत्कार झाला कसा?
तिथल्या नर्सेस, डॉक्टर, सगळ्यांनी सांगितलं की 'आधी' व 'नंतर' यात 'तो' माणूस हा एकच फरक होता।

खरं तर तो एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटलाही नाही.
'तुझं दु:ख सांग' नाही, 'रडून मोकळा हो' नाही, - काहीच नाही.
त्याने नक्की काय केलं, ते आता त्यालाच विचारा पण हे रुग्ण मुलापासून बरे झाले आहेत हे मात्र खरं।

ते गेले त्याच्याकडे।
म्हणाले, 'नक्की काय केलात तुम्ही? इतके रुग्ण, ते ही सगळी दुष्ट कर्म केलेले, वेडे, मनावर ताबा नसलेले, तुम्ही बरे कसे केलेत? काय जादू केलीत?'

त्या हवाईयन माणसाचं नाव होतं डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
त्याने हसून शांतपणे उत्तर दिलं.
'आमच्या हवाईयन प्रथेत असं मानतात की बाहेरच्या जगात, समाजात जे काही चाललं आहे, ते फक्त आपल्या आत मनात जे आहे, केवळ त्याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनाची स्थिती बदला'.
त्यांनी स्वत:वर उपचार केले होते!

कसे?

त्यांनी हवाईयन संस्कृतीतलं 'हो'पोनोपोनो' केलं होतं.
या शब्दाचा अर्थ आहे 'चूक दुरुस्त करणं'.

डॉक्टर लेननी प्रत्येक गुन्हेगाराची केस-फाईल आधी नीट वाचली.
त्याने केले खून, दरोडे, सगळं जाणून घेतलं, मग फाईल बंद करून शांतपणे बसून त्या व्यक्तीला उद्देशून मनाशी चार वाक्यं म्हंटली -

१.माझं चुकलं. ( I am sorry ).
२.मला माफ कर. (Please forgive me ) .
३.मी तुझे आभार मानतो. ( Thank you ).
४.माझं तुझ्यावर प्रेम आहे. (I love you ).

समाजात सगळ्या प्रकारच्या वृत्ती - प्रवृत्ती असतात. संताप, निराशा, हिंसा, क्रूरपणा - मनाने दुर्बल असलेले या वृत्ती एखाद्या स्पंजसारख्या शोषून घेतात. मग त्याच गुणाकाराने सगळीकडे वाढतात.
डॉक्टर लेननी असं मानलं की माझ्या मनातल्या अशा सुप्त वृत्तींचाच बाह्य प्रक्षेपण या रुग्णांतून होत आहे. याना सुधारायचं असेल तर मला माझ्या मनातली हिंसा कमी केली पाहिजे.
प्रत्येक रुग्णाची फाईल वाचून त्याला ' माझं चुकलं', 'मला माफ कर', 'मी तुझा आभारी आहे' व 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं सांगून त्यांनी त्या रुग्णाला तर सबळ, सकारात्मक बनवलाच पण स्वत:च्या मनातली सुप्त हिंसाही शांत केली.

आपल्याला 'जगात काय चाललंय ते कळतच नाही, लोक असे कसे वागतात न?' असं म्हणायची खोड आहे पण स्वत:च्या मनाचा अजिबात थांग नसतो.
आजूबाजूच्या जगातल्या घडामोडीमधून तुम्हाला जर सतत हिंसाच दिसत असेल तर तुमच्या मनात ती भरपूर आहे.
तिची खाज कमी करायच्या प्रयत्नात तुम्ही त्या बातम्या चवीने वाचता, चर्वित - चर्वण करता, घरच्यांवर भडकता, सरकारला शिव्या देता व सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय देशाचं काही भलं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगता.
विचार करा!

ही चार वाक्यं एक अतिशय शक्तिशाली अशी साधना आहे.
तुम्ही प्रत्येकाने ही नक्की करून बघा.

कशी करावी?
एक जागा निवडून तिथे डोळे मिटून २ मिनिटं {तरी!} शांत बसा.
ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्रास होतो, तिला नजरेसमोर आणा.
मग तिला उद्देशून ही ४ वाक्यं मनापासून म्हणा.
मनातच म्हणायची आहेत, म्हणून माफी मागायला हरकत नसावी!
आपल्या कुटुंबीयांपासून सुरुवात करा.
तुम्हीच त्यांना जन्म घेण्य आधी निवडलं आहे, म्हणून संबंध सुधारून पुढच्या प्रगतीसाठी मोकळे व्हा।

बाकी पुढील पोस्टमध्ये.
मजेत रहा -

Friday, January 14, 2011

प्रस्थान

नमस्कार !

जन्म, मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू हे चक्र कधी सुरू झालं असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊन जातो.
आपल्याकडे हे साधारणपणे सर्वमान्य आहे की हा जन्म मागच्या कर्मांची फळ भोगायला घ्यावा लागलेला आहे.

मला असं प्रश्न नेहमी पडायचा की मग मागचा जन्म का होता?
त्याच्या मागच्या जन्माची फळ भोगायला?

हे किती मागे जातं?
आणि कधी संपणार?

जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर 'हे मुळात सुरूच का झालं?' याचं आधी उत्तर हवं.
असं सगळं लक्ष केंद्रित करणारा स्पष्ट असा मस्त प्रश्न मिळाला की मजा येते !
उत्तरं फार लांबही नसतात, फक्त आपल्या मनाची क्षितिज जरा उघडायची.

आपल्या धार्मिक ग्रंथांतून पूर्ण समाधान न झाल्यावर मी इंग्रजीतली पुस्तकं वाचायला सुरुवात केली.
पहिल्या पुस्तकानेच 'आ' वासायला लावला.
नाव होतं, 'यू' व्ह बीन हिअर बिफोर!'.

वाटलं, 'हो?! खरच?! काय मज्जा!'

'असंही असू शकेल' असा दृष्टीकोन ठेउन शोधल्यावर भराभर वेग-वेगळ्या पैलूतून लिहिलेली असंख्य पुस्तकं मिळत गेली.

माझा मूळ प्रश्न विसरले नव्हते -
हे चक्र का आणि कशाने सुरु झालं?

आता जोडीला आणखीही आले होते-
सगळ्या मनुष्य जातीने अपराध केला होता?
कसला अपराध होता तो ?
आणि अजूनही आत्मे परत-परत जन्म का घेत आहेत?
कुणीच कसं कर्मांची फळे भोगून मुक्त होत नाहीये?

मग दोन वेगवेगळ्या स्रोतातून मस्त उत्तरं मिळाली.
नीट वाचून पचवा बरं का, आपल्याला स्वतः बद्दल असा विचार करून सवय नाहीये!

आपण सगळे 'को-क्रिएटर्स' आहोत, सृष्टीकर्ते आहोत.

आपल्याला सृजनाचा आनंद घ्यायचा होता, म्हणून आपण स्वेच्छेने जन्म घ्यायचं ठरवलं.

आपल्यावर कोणी जबरदस्ती नाही केली, कोणी शाप देउन, लाथ मारून पृथ्वीवर नाही पाठवलं.

आपले जन्म ही शिक्षा नाही, आपण विचारपूर्वक निवडलेला अनेक डावांचा खेळ आहे.
हा खेळ सुरू करण्याआधी आपण खूप विचार करतो.
खाली पृथ्वीवर, इतर ग्रहांवर काय चाललंय हे स्पष्ट दिसत असतंच!
काही जण एकटेच येऊन, अनुभव घेउन जायचं ठरवतात.
त्यांना नाती-गोती नको वाटतात. अशी माणसं माणूसघाणी वाटतात.
उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर ती आहेत, यावर ती काय करतात हे अवलंबून असतं.
उदाहरणार्थ, कुणी शास्त्रज्ञ असू शकेल, किंवा साधू, विचारवंत, संशोधक.
काही जण विचार करतात की एकटे नको रे बाबा, आपण १५० ते २०० च्या टोळीत जाऊ, तेवढंच जरा जास्त सुरक्षित वाटेल!

आपण बहुतेक जण या 'सूज्ञ' विचाराने आलेलो आहोत!
या टोळीतली माणसं आलटून पालटून एकत्र जन्म घेतात व आपणच निवडलेले धडे शिकत सृजनाचा आनंद अनुभवतात.


आपल्याला काय शिकायचं यावर अवलंबून आपण आपली रक्ताची व लग्नाची नाती निवडतो.
शिवाय गुरू, मित्र-मैत्रिणी सहयोगी व शत्रूही.

या दोनाशिवाय तिसराही एक गट आपण तयार करतो.
तो जास्त मोठा असतो, काही लाख किंवा कोटींचा, आणि तो असतो धर्मांचा, कातडीचा किंवा आपल्या देशात जातींचा.
आपण स्वतःच्या इच्छेने जे अनुभवायचं आहे, त्यावर अवलंबून त्या धर्मात, जातीत जन्म घेतो.
सृजनाचा आनंद घेत असताना जी कर्मं करतो, ती संपली, की आपण परत पूर्वीच्या स्थितीला जाउन मिळतो.
ही 'मुक्ति' प्रत्येक मृत्यूनंतर होत नाही. मुक्ति एकदाच असते.
आपण ध्येय ठरवून प्रस्थान ठेवल्यावर मार्गात जे आलं ते भोगत, चैतन्याच्या वरवरच्या पातळ्या गाठत, आनंद घेत शेवटी यातून बाहेर पडतो.

युरोप व अमेरीकेत्तोन या विषयांवरची जी पुस्तकं आली व येत आहेत, ती खूप विचार करायला लावणारी आहेत.
मला या सर्वातली एक गोष्ट खूप आवडली -
याची खात्री झाली की मला जे चांगलं - वाईट होतंय त्याला मी स्वतःच जबाबदार आहे.
ना कुणाची कृपा ना शाप!

मला हवं तसा आयुष्य हवं असेल तर काय नक्की काय करायचं, हे स्पष्ट झालं!

उत्क्रांतीच्या ज्या ७ पातळ्या आहेत, त्याबद्दल पुढच्या 'पोस्ट'मध्ये बघू.
काही प्रश्न, शंका, टीका जे असे ते पाठवा!
बाकी आयुष्य मस्त असतं म्हणून त्याच्यापेक्षा स्वतःला जास्त सामर्थ्यवान समजा!